- आलुरे गुरुजी - एक आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व
महाराष्ट्रातील एक पुरोगामी, निष्कलंक, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व असलेले ,महाराष्ट्राच्या विधानसभेत 55 वर्ष आमदार मंत्री पदावर राहून दलित, शोषित, पीडित ,वंचित ,कष्टकरी ,शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगारांच्या हितासाठी रस्त्यावरही लढा दिला ते शेतकरी कामगार पक्षाचे थोर आदर्श नेते डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधनाने 2-3 दिवस झाले न झाले तोच नियतीने त्याच तोलामोलाचे पूज्य सिद्रामप्पा नागप्पा उर्फ सि.ना.आलुरे गुरुजीवर घाला घातला. त्यांचे चरणी अश्रुपूर्ण नतमस्तक व्हावे असे दोन महापुरुष काळाने हिरावून नेले व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ शांत झाली या आदर्शाच्या छत्रछायेखाली जगणारी जनता दुःखाने बेभान झाली आहे.
आलुरे गुरुजी अतिसामान्य कुटुंबात पण शिस्तबद्ध संस्कारात जन्मले वाढले,व कर्तुत्वाने असामान्य पदावर पोहोचले व ज्या प्रकारे “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी ” या उक्तीप्रमाणे त्यांचे लक्ष दलित- शोषित वंचितावर अन्याय होणार नाही याकडे लक्षचित्त असायचे. बी.ए., बी.एड झाल्यानंतर चालून आलेल्या पोलिस निरीक्षकाची नोकरी नाकारली व सहेतुक शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित आलुरे गुरुजींनी श्री. खंडोबाच्या देवळातील यात्रेकरूंसाठी तयार केलेल्या रिकाम्या ओवऱ्यामध्ये जवाहर विद्यालय सुरू केले. या हायस्कूलमधून दोन वेळा विभागात, एक वेळा महाराष्ट्रात एस.एस.सी.ला सर्वप्रथम येऊन महाराष्ट्राला जवाहर विद्यालयाची गुणवत्ता सिद्ध केली. आज या हायस्कूलचे विद्यार्थी -विद्यार्थिनी महाराष्ट्र, देशात नव्हे तर देशाच्या सीमा पार विविध क्षेत्र आलुरे गुरुजी व जवाहर विद्यालय अणदुरचे नाव रोशन करताना दिसतात. एकही पैसा देणगी न घेता नेमणुका, पदोन्नती देणारी शासनाच्या नियमानुसार मागासवर्गीयांचा अनुशेष भरणारे एकमेव संस्थाचालक म्हणून आलूरे गुरुजींकडे बोट दाखवावे लागेल. या जवाहर विद्यालयाने शालेय शिक्षणाबरोबरच मुल्य शिक्षणावरही भर दिला आहे. अस्पृश्यता निवारणाची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होत असलेल्या अणदुर मध्ये जी काही सामाजिक समता अनुभवाला येते त्याचे संपूर्ण श्रेय एकट्या सि .ना. आलुरे गुरुजींचे होय.

देशकारणात ,राजकारणात महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, साने गुरूजी ,क्रांतिकारक यांचे राष्ट्रवादी विचार तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व शैक्षणिक विचार, राष्ट्रसंत गाडगे, बाबा नरेंद्र दाभोळकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विचार शिरोधार्य मानून आयुष्यक्रम कंठाला. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती दिवशी मौनव्रत धारण करीत अंधश्रद्धा निर्मूलनार्थ लढा देत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार झाला. पण ते ध्येयापासून थोडेही विचलित झाले नाहीत. उलट महात्मा फुले त्यांचा घात करायला आलेल्या मारेकऱ्यांच्या सामोरे गेले व त्याचे प्रबोधन करून परत पाठवले. त्याप्रमाणे आलुरे गुरुजींनी त्या लोकांना अभय देऊन मनपरिवर्तन केले.
डॉक्टर बाबा आढाव यांची “ एक गाव एक पाणवठा “ हि चळवळ अणदूरमध्ये यशस्वी करून दाखवली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लिंगायत धर्म मठांमध्ये वस्तीगृह सुरू केले. अणदूरच्या पंचक्रोशीतीलच नव्हे तर तीस-चाळीस किलोमीटर अंतरावरील मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहात राहून शिक्षण घेऊन उच्च विद्याविभूषित झाले. 1966 आली राम मारुती गायकवाड हा भातागली येथील मातृ सुखाला पारखा झालेला मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहात रात्री तापाने आजारी असल्याचे माहित झाल्यावर आलुरे गुरुजीनी त्या आजारी विद्यार्थ्याला घेऊन सोलापूरचा दवाखाना गाटला व रात्रभर त्याची आई-वडिलांसमान सेवा केली. महात्मा यापेक्षा वेगळा आणखी कसा असू शकतो ? अशीच भूमिका सहकारी शिक्षकांच्या बाबतीत दिसून येते .कै. तुकाराम कदम या शिक्षकास असाध्य रोगाने ग्रासले होते . त्यास रोगमुक्त करण्यासाठी परदेशी घेऊन जाण्याची तयारी दाखविणे त्याला सुद्धा आभाळाएवढे मन हवे असते ते गुरुजी जवळ होते . गुरुजींचा प्रत्येक शब्द व प्रत्येक पाऊल आदर्शाच्या दिशेने असतं. तीस-चाळीस कुटुंबियांचा कुटुंब प्रमुख म्हणून एकच संयुक्त कुटुंब पद्धतीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
आलुरे गुरुजी काँग्रेस संस्कृतीत वाढलेले - राहिले पण कार्यक्रम मात्र डाव्या विचारांच्या भाई उद्धवराव पाटील, एस .एम. जोशी डॉ. गणपतराव देशमुख ,भाई एन. डी. पाटील यांच्या तोलामोलाचे राबविला. आमदार म्हणून विधानसभेत सामान्यांचे प्रतिनिधित्व केले .महाराष्ट्रातून व बाहेर कुठेही पाणी टंचाई, दुष्काळ ,पूर, संकटे आल्यास गुरुजींनी आपल्या पेन्शन मधूनसुद्धा मोठमोठ्या मदती केल्या आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर विरोधी आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यात जाळपोळ, हिंसाचार, दगडफेकीचे, दलितांच्या हत्या, मारझोड याचे थैमान माजले होते.सर्व शिक्षण संस्था ,कार्यालये बंद होती अश्यावेळी अणदूरमध्ये एकाही बौद्धच्या घरावर एक खडा देखील पडला नाही, काही आंदोलक जवाहर विद्यालय बंद करण्यासाठी आले असता स्वतः आलुरे गुरुजी बेडरपणे समोर गेले व त्यांना “कोण आहात शाळा बंद करणारे ..! समोर या तुमचं म्हणणं काय आहे मला पटवून द्या “ असे आवाहनही केले. त्यावेळी आंदोलक दिसले व त्या वाटेने पसार झाले. त्या काळात मराठवाड्यात एकमेव अणदूरचे जवाहर विद्यालय चालू होते ज्याचे संस्थाचालक व मुख्याध्यापक आलुरे गुरुजी होते. स्वकीयांच्याही चुकीच्या धोरणाविरुद्ध जे लढतात ते बंडखोर,महात्मा ,महापुरुष समजले जातात .आलुरे गुरुजी त्यापैकीच एक होते .
महाराष्ट्राच्या आदर्शात मध्येआलुरे गुरुजींनी मोलाची भर घातली. महाराष्ट्रातल्या काही संकुचित व जातीयवादी राजकारणाने आलुरे गुरुजी यांचा बळी घेतला असे म्हणणे सयुक्तिक वाटते. आलुरे गुरुजी म्हणजे चालते बोलते मुल्यशिक्षणाचे विद्यापीठ होते. मराठवाड्यातील प्रचलित दोन विद्यापीठांनी मराठवाड्या बाहेरच्याना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले पण एकही विद्यापीठाला वा सिनेटराना आलुरे गुरुजी यांचे नाव का सुचले नाही ? हे अनाकलनीय व न उलगडणारे कोडे आहे.
गुरुजींचा सेवानिवृत्ती व नागरी सत्कार समारंभ स्व. मंत्री विलासराव देशमुख प्राचार्य ना.य. डोळे नामदार शिवाजीराव पाटील निलंगेकर, नामदार शिवराज पाटील चाकूरकर ,मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून गुरुजी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. गुरुजी संस्थाचालक आमदार मुख्याध्यापकच नव्हते तर ते एक उत्कृष्ट गणित शिक्षक होते .संस्थाचालक असून शिक्षक म्हणून अध्यापन करणारे एकमेव आलुरे गुरुजी होते. महाराष्ट्रातील संस्थाचालक, शिक्षक ,मुख्याध्यापकानांही आदर्श ठरावेत .आलुरे गुरुजींचा मी तीन वर्ष गणित विषयाचा विद्यार्थी आहे. हा माझा बहुमान आहे व माझे भाग्य समजतो.
आज गुरुजी हयात नाहीत पण त्यांचे विचार व कार्य शिरोधार्य मानून जीवनाची वाटचाल करणे हेच गुरुजी बद्दलचा आदर, श्रद्धेची ओळख ठरेल
गुरुजींच्या चरणी हे शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
गुरुजींचा विद्यार्थी
हरिभाऊ साधुराव बनसोडे [अणदूर]
[ सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी उस्मानाबाद ]
मो..8999586322