तुळजापूर तालुक्यातील १ लाख ७७ हजार ६६७ ........लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य
नळदुर्ग :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक लॉकडाऊन सुरू असुन या लॉकडाऊनच्या काळात गरीबांची उपासमार होऊ नये यासाठी महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारच्या वतीने राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. तुळजापुर तालुक्यातील अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील १ लाख ७७ हजार ६६७ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे यामध्ये अंत्योदय ४ हजार ९९२ व प्राधान्य गटातील २९ हजार २५९ शिधापत्रिकांचा समावेश असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी म्हटले आहे. सध्या सर्वत्र विशेष करून महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठया प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची सर्वाधिक झळ सर्वसामान्य व गरीबांना बसली आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे मोठे हाल होत आहेत. कामधंदा नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. या लॉकडाऊनच्या काळात कामगार तसेच मजुरांचेही मोठे हाल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरीक, कामगार, मजुर, तसेच छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ किलो गहु व २ किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी ३५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. शासनाच्या या मोफत अन्नधान्य देण्याच्या या निर्णयामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुळजापुर तालुक्यात या मोफत अन्नधान्य वाटपाचा फायदा अंत्योदय व प्राधान्य गटातील जवळपास १ लाख ७७ हजार ६६७ लाभार्थ्यांना होणार आहे. तुळजापुर तालुक्यात अंत्योदय गटातील ४ हजार ९९२ तर प्राधान्य गटातील २९ हजार २५९ शिधापत्रिका आहेत. या सर्व शिधापत्रिकाधारकांना हे मोफत अन्नधान्य मिळणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment