Thursday, 22 April 2021

विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाची धडक मोहीम राबवून कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाई

 विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात  प्रशासनाची धडक मोहीम राबवून केली कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाई




नळदुर्ग /लतीफ शेख
नळदुर्ग बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर  विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांविरोधात तहसिलदार सौदागर तांदळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्याची संयुक्त धडक मोहीम राबविण्यात आली. यावेळी विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांची कोरोना चाचणी करण्याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन सर्वसामान्य नागरीकांनी मात्र प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यु होत आहे. तर हजारो लोक कोरोनामुळे बाधित होत आहेत. कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
        राज्य शासन नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग थांबविण्यासाठी तसेच कोरोनाची वाढत चाललेली साखळी तोडण्यासाठी अनेक कडक निर्बंध लावले आहेत. राज्यशासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे यासाठी पोलीस, तहसील, नगरपालिका व आरोग्य प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. असे असताना नागरीकांना मात्र कोरोनाचे कुठलेच भय नाही. नागरीक, व्यापारी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते हे अतिशय बेफिकीरीने वागत आहेत याचाच परीणाम म्हणुन आज कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. ही परिस्थिती थांबविण्यासाठी सरकार व प्रशासन अतिशय चांगले काम करीत आहे. मात्र काही बेफिकीरीने वागणाऱ्या नागरीकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नळदुर्ग शहरात जे व्यापारी, भाजीपाला तसेच फळ विक्रेते मास्कचा वापर करीत नाहीत अशाना शहरात व्यापार करण्यास तसेच फळे व भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देऊ नये. कारण अशा बेफिकीरीने वागणाऱ्या माणसांमुळेच आज कोरोना वाढत चालला आहे. 
   २२ एप्रिल रोजी नळदुर्ग बसस्थानकासमोर तहसिलदार सौदागर तांदळे  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने, न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, मंडळ अधिकारी अमर गांधले, नळदुर्ग बिटचे सतिश घंटे, विशाल सगर, रुपेश पाटील, मन्मत पवार,जाकेर काझी,भिमा गायकवाड, अमोल फतापुरे,गणपत मुळे,जिविशा चे धनंजय वाघमारे, नगरपालिकेचे मुनीर शेख, खालील शेख, राजाभाऊ सुतार, मुस्ताक पटेल, अण्णा जाधव ,ज्योती बचाटे, खंडू शिंदे ,शहाजी येडगे यांनी विनामास्क तसेच विनाकारण दुचाकीवरून किंवा पायी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबविली. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांची नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, डॉ यशवंत नरवडे यांनी कोरोना चाचणी केली याचबरोबर प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली. यामुळे विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली. वास्तविकपाहता आशा प्रकारची कारवाई प्रशासनाने नळदुर्ग शहरात वारंवार करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment