स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या पोषणबागेस डॉ. विजयकुमार फड यांची भेट
उस्मानाबाद,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील मौजे कनगरा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. विजयकुमार फड यांनी भेट दिली. कनगरा येथील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या पोषणबागेस त्यांनी भेट दिली. पोषण परसबागा आखणीत उस्मानाबाद जिल्हा राज्यात द्वितीय आहे. गावातील सर्व महिलांनी अशाच पद्धतीने पोषण परसबागा तयार करून आपल्या कुटुंबाच्या आहारात विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाल्याचा समावेश करावा, कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेऊन, आरोग्यावरचा खर्च कमी करावा असे मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. गावात वृक्षलागवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामस्थांनी 10 हजार वृक्षांची लागवड करावी असे सांगितले.
उडान महिला ग्रामसंघातर्गत असलेल्या एन. पी.के. उत्पादक गटाच्या शिलाई युनिटला,तसेच घरकुल मार्टला देखील त्यांनी भेट दिली,त्यांनी मागील काळात केलेला व्यवसाय, बाजारपेठ, इ.बाबत जाणुन घेतले, जिल्हयातील उमेद अंतर्गत सर्व महिलांनी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन त्याला लसीकरण हाच एक पर्याय असल्याने आपल्या गावातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले.
यावेळी गावच्या सरपंच मैनाबाई तिगाडे, उपसरपंच संजय दळवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलविर मुंडे , जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, गोरक्षनाथ भांगे, तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे, तालुका व्यवस्थापक राहुल मोहरे, ग्रामसेवक शिवाजी बोचरे, उडाण महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा जन्नत अजमेर शेख, तसेच उमेद अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या.


No comments:
Post a Comment